रुग्णवाढीची चिंता करू नका
अॅन्टीजेन टेस्टिंग करणारी देशातील दुसरी महानगरपालिका ठरली असली तरी रुग्णवाढीची चिंता न करता कोरोनामुळे लोकांचे बळी जाऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कार्य केले पाहिजे. अशा सूचना केंद्रीय पथकातील सदस्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे मनपाला आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
औरंगाबाद शहरात गेल्या चार महिन्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आजपर्यंत 12 हजार 942 रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी 8 हजार 159 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सुखरुप गेले आहेत. सध्या 4 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 437 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यशासन आणि महानगरपालिका प्रशासनातर्फे कसे काम चालू आहे यासाठी शनिवारी केंद्रीय पथक आले होते. या पथकात कुणालकुमार, नागपूर एम्सचे डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सीताकांत बॅनर्जी यांचा समावेश होता. कुणालकुमार हे 2011 ते 13 दरम्यान औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्यज्ञातील सर्व भागाची चांगल्याप्रकारे माहिती आहे. कुणालकुमार व त्यांच्या सहकार्यांनी सर्वप्रथम मनपा प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती घेत आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन सादर केले व मनपातर्फे सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. घरोघर सर्वेक्षण करणे, एक हजार मोबाईल फिव्हर क्लिनिक सुरू केले. तसेच अॅपद्वारे जनतेकडून माहिती घेऊन रुग्णांना तातडीने सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच बाहेर गावाहून येणार्या प्रत्येक नागरिकांचा सिटी एन्ट्री पाईंटवर तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती पथकाला देण्यात आली. पथकातील अधिकार्यांनी मनपाने दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, अशा पुंडलिकनगर परिसर, वाळूज परिसरातील वसाहतींना भेट देत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपा प्रशासनाकडून कोरोनाला आळा घालण्यासाठी जनजागृतीसह संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसह लॉकडाऊनही लावण्यात आला होता. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असली तरी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. मे,जून महिन्यात मृत्यूचा दर मोठ्या प्रमाणात वाढला होता पण दोन आठवड्यापासून मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ते आणखी कमी करून मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग सुरूच राहणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्या किती वाढली याकडे लक्ष न देता लोकांचे बळी रोखण्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर आली आहे.












